बुलडाणा :- राज्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या “जेवढा वापर तेवढा सोलर बसवणे” या नियमावलीविरोधात सोलर विक्रेते व संबंधित व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नियमाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करत सिंदखेडराजा येथील सोलर उद्योग प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
सदर नियमामुळे सोलर उद्योगासमोर विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, हा निर्णय उद्योग प्रतिनिधींशी कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता लागू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रस्तावित प्रकल्प, ग्राहकांसोबतचे करार आणि व्यवसायिक नियोजनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.
याशिवाय या धोरणामुळे उद्योगातील कामकाजावर मर्यादा येत असून बाजारातील स्पर्धात्मकता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचे निर्बंध नसताना महाराष्ट्रातच हा नियम लागू केल्याने राज्यातील विक्रेते स्पर्धेत मागे पडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी उद्योगाच्या वाढीवर तसेच रोजगारनिर्मितीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे…..
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांनी शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत —
• सद्य:स्थितीतील नियम तात्काळ स्थगित करावा किंवा मागे घ्यावा.
• उद्योग संघटना व तज्ज्ञांशी चर्चा करून व्यवहार्य व सुधारित धोरण तयार करावे.
• आधीच मंजूर किंवा सुरू असलेल्या प्रकल्पांना या नियमातून सूट द्यावी.
सदर निवेदनावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सोलर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
