राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तहसीलदारांकडे मागणी
देऊळगावराजा :- खुल्या बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा खाली गेले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने मका खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी २४००/- रुपये प्रति क्विंटल हमीभावाने मका खरेदी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र देऊळगावराजा तालुक्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापही मका खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. खुल्या बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यात यंदा मका उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मका खरेदी करणे सुरु नसल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना खाजगी बाजारात मका विक्री करावी लागत आहे.परिणामी खाजगी व्यापारी शेतकऱ्यांकडून १३०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदी करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे देऊळगावराजा तालुक्यातील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासकीय हमीभाव केंद्रावर मका खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, महेश देशमुख, पं.स. माजी सभापती हरीश शेटे, गणेश बुरकूल, सरपंच संदीप म्हस्के, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, बबन डोके, शे.कदीर, शेषराव कोल्हे, संजय खरात, गजानन चेके, अशोक शेळके, धर्मराज खिल्लारे, बळीराम भागिले आदींनी केली आहे.
