एमएच ३० बीडी २२४७ क्रमांकाचा टिप्पर अवैधरीत्या रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच महसूल पथकाने सापळा रचत वाहन अडवले. तपासणीदरम्यान टिप्परमध्ये सुमारे तीन ब्रास रेती आढळून आली. कोणतीही वैध परवानगी नसल्याने तात्काळ वाहनासह रेती जप्त करण्यात आली.
हा टिप्पर अंढेरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाईत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, सहाय्यक महसूल सेवक कविता खरात आणि संदीप चेके यांनी सक्रिय भूमिका बजावली.
दरम्यान, प्रशासनाकडून सातत्याने मोहीम राबवली जात असतानाही रेती तस्कर मात्र नवनवीन मार्ग शोधत महसूल यंत्रणेला चकवा देत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी किंवा दुर्गम भागातून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे ही कारवाई जरी ठोस असली तरी, रेती माफियांविरुद्ध सातत्यपूर्ण आणि व्यापक मोहिमेची गरज अधोरेखित होत आहे.
विशेष म्हणजे, खडकपूर्णा नदी पात्र परिसरात अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून, स्थानिक नागरिकांकडूनही यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. नदीपात्राची हानी, भूजल पातळीतील घट आणि रस्त्यांचे नुकसान या समस्यांमुळे प्रशासनावर दबाव वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने केलेली ही कारवाई केवळ एका टिप्परपुरती मर्यादित नसून, रेती माफियांना दिलेला इशारा मानला जात आहे. “अवैध धंदा चालू देणार नाही,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला असला, तरी आता पुढील कारवाई कितपत कडक होते आणि तस्करांवर कायमस्वरूपी लगाम बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
