राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्याकडे मागणी
देऊळगावराजा :- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर करताना अनेक जाचक अटी घातल्या आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता दोन लाखापर्यंत कर्जमाफीचे आश्वासन देऊन प्रतिक्षा बहुसंख्य शेतकऱ्यांची पन्नास हजार रुपयांवरच बोळवण केली आहे. कर्जमाफीसाठी लागू करण्यात आलेल्या चाचक अटी शर्ती मुळे ही कर्जमाफी आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफीमध्ये सर्वाधिक कठोर ठरणार असून, अत्यल्प शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. जाचक अटींमुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असून केवळ बँकांच्या वसुलीस मदत होत आहे.त्यामुळे कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करुन २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, एक रकमीकर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अट शिथिल कराव्यात,दोन लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी रक्कम भरण्याची अट न टाकता त्यांना सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी करावी, तसेच प्रोत्साहन पर अनुदान देताना सलग दोन वर्ष नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी.शिवाय २०१७ च्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, प.स.माजी उपसभापती सुधाकर म्हस्के, बाजार समितीचे माजी सभापती महेश देशमुख, खरेदी -विक्री संस्थेचे संचालक शिवाजी कोल्हे, गणेश शिंदे, नगरसेवक ॲड.रामेश्वर रामाने, शरद डोईफोडे,दत्ता टकले, रमेश नरोडे, नगर सेवक शिवा मेहेत्रे, संजय खरात, गजानन हिवाळे, ज्ञानेश्वर सोनुने, बबनराव डोके, रावसाहेब डोके आदींनी केली आहे.
सरकारने शेतकरी कर्जमाफी ची केलेली घोषणा ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली करण्याची योजना आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्तींमध्ये एकही शेतकरी बसू शकत नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना सरकारने जाचक अटींसह कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.
राजेश इंगळे पाटील
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) देऊळगावराजा
