देऊळगावराजा :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून देऊळगावराजा नगरपरिषदच्या जाफ्राबाद रोडवरील नवीन व्यापार संकुलास “लोकनेते स्व.अजितदादा पवार व्यापार संकुल” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करुन महाराष्ट्राच्या प्रशासनात व्यापक अनुभव मिळवला होता. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून त्यांना राज्याचे अर्थसंकल्प हाताळण्याचाही अनुभव होता. सिंचन आणि जलसंपदा विभागात काम करतांना त्यांनी अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती दिली. या अनुभवामुळे त्यांना प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर मजबूत पकड मिळाली आणि विकासकामांना चालना देण्याची त्यांची क्षमता त्यांच्या नेतृत्वातून स्पष्ट दिसत होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. आपल्या घरातीलच कोणीतरी व्यक्ती गेली, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाली आहे.
स्व.अजितदादा पवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून जाफ्राबाद रोडवरील राजश्री छत्रपती शाहू महाराज नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेसमोरील नगरपरिषदच्या नवीन व्यापार संकुलास “लोकनेते स्व.अजितदादा पवार व्यापार संकुल ” असे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, माजी सभापती गजानन पवार, गणेश सवडे, नगरसेवक शिवाजी मेहेत्रे, शरद डोईफोडे, महेश देशमुख, अनिल रामाणे, शहराध्यक्ष विष्णू रामाणे, कवीश जिंतूरकर, नवनाथ गोमधरे आदींनी केली आहे.
