जालना जिल्ह्यातील युवकाचा निर्घृण खून!
मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून हत्येचा संशय

सिंदखेडराजा :- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी गावातील एका युवकाचा निर्घृण खून करुन त्याचा मृतदेह किनगावराजा पोलिस ठाणे हद्दीतील तढेगाव शिवारात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरेश तुकाराम आर्दड (रा.राजाटाकळी, ता.घनसावंगी, जि.जालना) असे या युवकाचे नाव असून, वाळूतस्करीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आज (दि.२९ जून २०२५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला एक युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असली तरी, अधिक तपासात या युवकाची ओळख पटली आहे. विशेष म्हणजे मृत युवकाच्या उजव्या हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र गोंदलेले आढळले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घनसावंगी पोलिसांनी २८ जून रोजीच अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर आता ही हत्या असून, मृतदेह दुसऱ्या पोलीस ठाणे हद्दीत टाकण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या किनगावराजा पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद नरवाडे, पोहेकॉ. विष्णू मुंढे व पोशि. सुभाष गीते अधिक तपास करत आहेत. मारेकऱ्यांचा शोध घेणे हे दोन्ही पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.